तिमिराकडूनी तेजाकडे
(इतिहास आपल्या आश्रमशाळेचा)
लोणावळ्या जवळील पांगोळली व ठाकरवाडी परिसरातील आदिवासी बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. सन १९८६ - ८७ च्या दरम्यान कुपोषणामुळे आदिवासी बालकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेची कल्पना पूर्वीपासूनच सामाजिक कामकाज करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमला समजली. त्यांनी या परिसरातील वाडीवस्तीवरील कुपोषित मुलांना मोफत औषधोपचार सुरू केला. प्रत्येक वेळेस त्या वाडीवस्तीवर उपचारासाठी जात असताना ते आपल्यासोबत त्यांच्यासाठी पोषक आहार व अंडी पुण्यातून घेऊन जात होते. म्हणून सुरुवातीला अंडेवाले डॉक्टर अशी त्यांची ओळख वाडीवस्तीवर निर्माण झाली होती.
या परिसरातील कुपोषणामुळे मृत्यू झाल्याने आदिवासी विभागाचे अधिकाऱ्यांनी देखील या भागात पाहणी दौरे करून त्यावर उपाययोजना सुरू केल्या. या दरम्यानच्या काळात तेथील गावकऱ्यांनी या डॉक्टरांच्या टीमबाबत आदिवासी विभागाच्या शासन अधिकाऱ्यांना माहिती दिली. या वाडीवस्तीवरील पुढील भेटीमध्ये डॉक्टरांच्या टीमची व आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांची भेट झाली. या भेटीच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी या डॉक्टरांच्या टीमला ‘आपण शाळा सुरू करावी’ असा सल्ला दिला. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी व अनुदान देण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तथापि, शाळा चालवणे आणि आरोग्य विभाग हे दोन्हीही वेगळे आहेत आम्हाला शाळा चालवणे शक्य होणार नाही कारण आमच्या कामाचे स्वरूप वेगळे आहे असे त्यांनी सांगितले. परंतु गावकरी आणि शासन अधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव डॉक्टर टीमपैकी काही मंडळींना त्यांचा शाळा सुरू करण्याचा विचार योग्य वाटला. या समस्येवर शाश्वत स्वरूपाचा मार्ग निघू शकतो, अशा विश्वास या विश्वस्त मंडळींना वाटला म्हणून त्यांनी या परिसरामध्ये ‘आदिशक्ती’ नावाने विश्वस्त संस्था स्थापन करून आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या संस्थेचे विश्वस्त मा.डॉ.अनिल गांधी, मा.डॉ.पटवर्धन, मा. अनिल कंडा, मा.बी जे शिर्के, मा.प्रताप शिर्के, मा. ज्ञानेश किर्तीकर यांच्या विचारातून दि. १८ नोव्हेंबर १९८६ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे, यांच्या परवानगीने आश्रमशाळेची स्थापना नोव्हेंबर १९८९ मध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गापासून सुरू झाली. सुरूवातीला शाळेत फक्त २० विद्यार्थी प्रवेशित होते. दरवर्षी वर्गवाढ होऊन १९९५ मध्ये इयत्ता ७ वीपर्यंत वर्गवाढ झाली. कुणे (ना. मा.) ठाकरवाडी येथे बालवाडी प्रकल्पदेखील सुरू होता. आदिशक्ती ट्रस्ट आश्रमशाळा ही लोणावळ्याजवळील पांगोळली येथील डोंगरावरील ठाकरवाडी येथे तीन गुंठे जागेत सुरू झाली. अतिशय दुर्गम भागात सदर आश्रमशाळा सुरू होती. परंतु भौतिक सुविधा, प्रशस्त जागा, बाजारहाट, आरोग्य व इतर सोयी सुविधा इ. गोष्टी तत्परतेने मिळण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या.
सन १९९९ मध्ये मा. डॉ. धनंजय केळकर, सौ. स्वाती केळकर व डॉ. बोकील मॅडम हे नवीन विश्वस्त आदिशक्ती ट्रस्टमध्ये घेण्यात आले. साधारणतः २५० विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. डॉ. धनंजय केळकर यांच्या प्रयत्नाने पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये आदिशक्ती ट्रस्टचे विलीनीकरण झाले व ही शाळा सन २००६-७ मध्ये कामशेत येथे स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाली. भारतरत्न मा. श्रीमती लता मंगेशकर या खासदार असताना त्यांनी आश्रमशाळेसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व त्यातूनच बांधकामाचा श्रीगणेशा झाला.
आश्रमशाळेला महर्षी कर्वे संस्थेच्या माध्यमातून सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून आज इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ४५० आदिवासी विद्यार्थी शाळेत निवासी राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. जून २०१२ नंतर इयत्ता ८ वी पासून पुढे नैसर्गिक वर्गवाढ होत गेली. सन २०१४- १५ मध्ये इयत्ता दहावीची प्रथम तुकडी १००% निकाल लागून बाहेर पडली. आज पर्यंत इयत्ता दहावीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असून ती शाळेच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था कर्वेनगर येथील संस्थेत विनामूल्य केली जाते. आश्रमशाळेत ८० ते ९० वाडीवस्त्यांवरील विद्यार्थी व विद्यार्थिनी निवासी राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत.
शासकीय वेळेव्यतिरिक्त अधिकचा वेळ देणारे येथील शिक्षक आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करणारे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. सन २०२०-२१ च्या कोरोना काळात शाळेला सुट्टी असताना शिक्षकांनी विद्यार्थी गृहभेट देऊन त्यांच्या वाडीवस्तीवर जाऊन अध्यापन केले. तसेच या काळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून संस्थेने प्रत्येक आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले.
शाळेत विविध कार्यक्रम, गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, कौशल्य विकासासाठी विविध प्रकल्प, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा, शिबिरे चालतात. आज शाळेत शेती प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, व्यक्तिमत्व विकास शिबिर, संस्कृत संभाषण वर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षण, चित्रकला स्पर्धा, हस्तकला, पेपर आर्ट, क्रीडा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, फालीचा कृषी उपक्रम, गडकोट सहली, शाळेत अनोख्या पद्धतीने साजरे होणारे सण-उत्सव ही आश्रमशाळेची वेगळी ओळख बनली आहे. असं सगळं काही असलं तरी या सर्व गोष्टींची यशस्विता ज्यामुळे आहे ते म्हणजे शाळा व्यवस्थापन, सर्व कर्मचारी आणि शिस्तप्रिय विद्यार्थी.
आपली शाळा भौतिक साधनांनी युक्त आहे. या भौतिक सोयीसुविधा अनेक कंपन्यांच्या (सीएसआर फंड) सामाजिक बांधिलकीच्या योजनेअंतर्गत शाळेच्या विविध प्रकल्पांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाल्यामुळे शाळेच्या व वसतिगृहाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास उपयोग झाला आहे. विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य, शाला समिती सर्व सदस्य, शाळा व वसतिगृहातील सर्व कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात.
नियमित व्यायाम, योग, उत्कृष्ट आहार, योगनिद्रा, उपासना या दिनाचर्येसोबतच प्रसन्न वातावरणाने युक्त अशी ही आश्रमशाळा आहे. विद्यार्थीहितासाठी अहोरात्र कष्ट घेणारी संस्था पाठीशी असल्यामुळे सर्व परीक्षांचे निकाल उत्तम असतात. यावर्षीची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामधील ३३ शाळांमध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. अशीच यशाची उज्ज्वल परंपरा क्रीडा स्पर्धेमध्येही राहत आहे. राज्यस्तरावर आपल्या विद्यार्थिनी नेहमीच चमकत असतात. गेल्या वर्षी ४-५ विद्यार्थिनींनी सांघिक तसेच वैयक्तिक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे.
आपल्या आश्रमशाळेची वाटचाल आणखी उज्वल भविष्याकडे होण्यासाठी शाळा विविध नामांकित संस्थाशी जोडलेली आहे. त्यात मनःशक्ती केंद्र, लोणावळा, ज्ञानप्रबोधिनी निगडी, ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे, संस्कृत भारती, श्री ट्रस्ट संस्था कार्ला, राष्ट्रसेविका समिती, एफसीएल, क्रीडा भारती, सह्याद्री प्रतिष्ठान तसेच गावातील विविध सामाजिक संस्थाही शाळेला जोडलेल्या आहेत.
शाळा व गावकरी यांच्याबरोबरचे संबंधदेखील सलोख्याचे व आत्मीयतेचे आहेत त्यामुळे शाळेतून निघणाऱ्या आषाढी एकादशी दिंडीचे स्वागत गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे व उत्साहात केले जाते. नवरात्र उत्सवामध्ये गावात होणाऱ्या दुर्गा दौडमध्ये गावकऱ्यांबरोबर शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होतात. शाळेमध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्येही गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. दीपावलीमध्ये मुले घरी जाण्याच्या अगोदर शाळेत मोठा दीपोत्सव व किल्ले-स्पर्धा होते. यामध्येही गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करतात. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शाळेत 'मातृहस्ते भोजन' हा अनोखा उपक्रम गावकऱ्यांच्या पुढाकारातून शाळेत घेतला जातो. पणत्या रंगवणे, राखी बनवणे व त्यांची विक्री करणे यामध्येही गावकरी मोठ्या संख्येने स्वतःहून सहभागी होतात.
या वर्षी शाळा पंचपरिवर्तनाच्या स्वदेशी, सामाजिक समरसता, पर्यावरण जागृती, कुटुंब प्रबोधन व सामाजिक शिष्टाचार या पंचसूत्रीवर काम करणार आहे.
आश्रमशाळेचे ध्येय- महाराष्ट्र राज्यात आदर्श आश्रमशाळा निर्माण करणे.
आश्रमशाळेचे मिशन -व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कोर्स आदिवासी विद्यार्थी व बांधवांसाठी उभारणे.
शंकर महादेवन अकॅडमी द्वारे संगीत वर्ग ही प्रस्तावित आहे.